सीमावाद चर्चा आणि शांततापूर्ण मार्गानं सोडवण्याची सरकारची भूमिका – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): केंद्र सरकार देशाची सीमा, त्याचा सन्मान आणि स्वाभिमान याबाबत कधीही तडजोड करणार नाही, असं मत व्यक्त करीत आम्ही आमच्या सीमांचं पावित्र्य कधीही भंग होऊ देणार नाही, असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं.
ते काल जम्मूमध्ये राष्ट्रीय सुरक्षा परिषदेला संबोधित करताना बोलत होते. चीनच्या पीपल लिबरेशन आर्मीला सीमा भागात एकतर्फी बदल करायचे होते मात्र आपल्या शूर सैन्यानं त्यांचा हा कुटील डाव उधळून लावला, असं सांगत ते म्हणाले की गलवानचा संघर्ष हा देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिला जाईल. सीमेचा प्रश्न हा चर्चेनं आणि शांततापूर्ण मार्गानं सोडवण्याच्या सरकारच्या भूमिकेचा संरक्षण मंत्र्यांनी यावेळी पुनरुच्चार केला.
ते पुढे म्हणाले की, सीमावाद सोडवण्यासाठी लष्करी आणि राजनैतिक पातळीवर चर्चा सुरू असून ही बाब देशाच्या सुरक्षेशी संबंधित असून सीमा सुरक्षा आणखी मजबूत करण्यासाठी पावलं उचलली गेली आहेत. पाकव्याप्त काश्मीरच्या संदर्भात बोलताना राजनाथ सिंग म्हणाले की, जम्मू-काश्मीरचा मोठा भाग अवैधरीत्या पाकिस्तानच्या ताब्यात आहे.
मात्र लवकरच तो दिवस येईल, ज्या दिवशी पाकव्याप्त काश्मीरमधील लोक पाकिस्तानच्या विरोधात आवाज उठवतील आणि भारतात सामील व्हायला तयार होतील. संपूर्ण जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता,आहे आणि राहील, असं सांगत सीमावर्ती भागात रस्ते आणि पायाभूत सुविधांचा विकास झाला असून तो अधिक विकसित करण्यात येत असल्याची माहिती संरक्षण मंत्र्यांनी यावेळी दिली.