प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वांना आषाढी एकादशीच्या दिल्या शुभेच्छा
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पवित्र दिवशी सर्वांना वारकरी पंथात अभिप्रेत असलेल्या त्याग, माणुसकी आणि दयाळूपणा या भावनांची प्रेरणा मिळो असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे. विठ्ठलाच्या आशिर्वादानं प्रत्येकानं आनंदी, शांतीप्रिय आणि सर्वसमावेशक समाज घडवण्याचं कार्य करावं अशी अपेक्षा प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशातून व्यक्त केली आहे. माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी सर्वांचं जीवन विठ्ठलाच्या आशिर्वादानं उजळून निघो आणि आपण सर्व समृद्ध समाजाच्या निर्माणासाठी एकत्र काम करु अशा शब्दात आषाढीच्या शुभेच्छा देणारं ट्विट केलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनीही समस्त जनतेला आषाढीच्या शुभेच्छा देणारं ट्विट केलं आहे. राज्यातील जनतेला, वारकरी माऊलींना, समस्त पांडुरंग भक्तांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आपल्या ट्विटर संदेशातून दिल्या आहेत. सर्व जाती, धर्म, पंथांच्या भक्त माऊलींना एकत्र आणणारी, स्त्री-पुरुष समानतेचं दर्शन घडवणारी, महाराष्ट्राच्या मातीला आध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिकदृष्ट्या समृद्ध करणारी पांडुरंग भक्तीची, आषाढी वारीची ही पताका अशीच डौलानं उंच फडकत राहूदे. सर्व जाती, धर्म, पंथांच्या नागरिकांमधली एकजूट कायम ठेवून महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्याची ताकद आम्हा सर्वांना दे, असं मागणं आपण पांडुरंगाकडे मागतो असं त्यांनी संदेशात म्हटलं आहे.