नवी दिल्ली(वृत्तसंस्था): चांद्रयान-3 पुढच्या महिन्याच्या तारखेला दुपारी अडीच वाजता आकाशात झेपावेल अशी माहिती काल अधिकृत सूत्रांनी दिली. चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवण्याचं गुंतागुंतीचं तंत्रज्ञान साध्य करण्याचा भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेचा उद्देश आहे. चांद्रयान-2 या मोहिमेचा पुढचा भाग असलेल्या या मोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षितरीत्या यान उतरवणं आणि त्याचं भ्रमण साध्य करणं हे आव्हान असेल.
यात लँडर आणि रोव्हरची मांडणीही महत्त्वाची आहे.चांद्रयान-3 मध्ये आंतरग्रहीय मोहिमांसाठी आवश्यक असलेलं स्वदेशी बनावटीचं लँडर मॉड्यूल, प्रोपल्शन मॉड्यूल आणि रोव्हर यांचा समावेश आहे. लँडरच्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणं, रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावर भ्रमण करणं आणि तिथे काही वैज्ञानिक प्रयोग यशस्वी करणं हे या मोहिमेचं ध्येय आहे.