‘राजमाता जिजाऊ युवती स्व-संरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम’ लढण्याचे बळ देणारा – महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा
Ekach Dheya
मुंबई : गुरूपौर्णिमेनिमित्त ‘राजमाता जिजाऊ युवती स्व-संरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम’ आजपासून राज्यात सुरू करण्यात आला आहे. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी राज्य शासन विविध उपक्रम राबवित आहे. युवतींना कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याचे, लढण्याचे प्रशिक्षण या उपक्रमातून दिले जाणार आहे, असे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
‘राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम’ आजपासून राज्यात सुरू होत आहे. या कार्यक्रमाचा प्रातिनिधिक स्वरूपात मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे महिला व बालविकास मंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, महिला व बालविकास विभागाचे आयुक्त राहुल मोरे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ.इंदू जाखड, अभिनेत्री अदा शर्मा, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी, भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या सदस्य ॲड. लीना चव्हाण, मंजुळा नायर, मिशन साहसी संघटनेचे रोहित ठाकूर, मुंबई विद्यापीठ, एस. एन.डी. टी. विद्यापीठाच्या 200 विद्यार्थिनी देखील उपस्थित होत्या.
मंत्री श्री. लोढा म्हणाले की, महिलांवर होणारे अत्याचार आणि हल्ले याला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. शाळकरी व महाविद्यालयीन युवतींना स्व-संरक्षणाचे धडे देण्यासाठी हा उपक्रम खूप महत्त्वाचा आहे. कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याची आणि लढण्याची ताकद या उपक्रमातून शिकता येणार आहे. याचा राज्यातील शाळकरी व महाविद्यालयीन युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या उपक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या.
स्व-संरक्षणाच्या प्रशिक्षणातून युवतींचा आत्मविश्वास वाढेल : डॉ.अनुपकुमार यादव
महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 वे राज्याभिषेक वर्ष सुरू आहे. त्यानिमित्त राज्यात 3 लाख 50 हजार युवतींना स्व-संरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महिला व बाल विकास विभाग आणि राज्यातील सर्व विद्यापीठे व स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने आजपासून 15 जुलै दरम्यान प्रत्येकी तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. युवतींचे मनोबल उंचाविण्यासाठी तीन दिवस समुपदेशन सत्र ठेवलेले आहे. तसेच ‘तंत्रज्ञान व महिला व मुलींना असलेले धोके’ या विषयावर सायबर सेल तज्ञ अधिकारी मार्गदर्शन तसेच स्व-संरक्षणाचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.
यावेळी भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या सदस्य ॲड.लीना चव्हाण यांनी काळाची गरज लक्षात घेता महिलांनी देखील अडचणींना सामोरे जाण्यासाठी स्व-संरक्षण धडे घेणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले. अभिनेत्री अदा शर्मा यांनी सध्या महिलांसमोरील वाढलेली आव्हाने पाहता अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.