नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरमध्ये, अमरनाथ यात्रेकरूंची आठवी तुकडी आज पहाटे भगवती नगर यात्री निवास इथून कडक सुरक्षा व्यवस्थेत, अनंतनाग जिल्ह्यातल्या नुनवान पहलगाम आणि गंदरबल जिल्ह्यातल्या बालताल या बेस कॅम्पकडे रवाना झाली. या तुकडीत सात हजारापेक्षा जास्त यात्रेकरू आहेत. हे यात्रेकरूआज संध्याकाळपर्यंत आपापल्या बेस कॅम्पवर पोहोचतील, आणि उद्या सकाळी पुढल्या प्रवासासाठी निघतील.
यात्रा कंपन्यांनी बनावट नोंदणी कागदपत्र देऊन फसवणूक केलेल्या ३०० पेक्षा जास्त यात्रेकरूंना, प्रशासनानं जम्मू इथल्या तात्काळ काऊंटरवर नवीन नोंदणी करून यात्रेची परवानगी दिली आहे. यंदा १ जुलै रोजी यात्रा सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकूण ८४ हजार ७६८ यात्रेकरूंनी अमरनाथ गुंफेला भेट दिली आहे.दरम्यान, आज सकाळी नुनवान-पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवर पुढे जाणारी यात्रा पावसामुळे तात्पुरती थांबवण्यात आली आहे.