प्रधानमंत्र्यांनी गोरखपूर -लखनौ आणि जोधपूर- अहमदाबाद वंदे-भारत-एक्सप्रेसला दाखवला हिरवा झेंडा
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात गोरखपूर इथं गोरखपूर -लखनौ-वंदे-भारत-एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. जोधपूर- अहमदाबाद-वंदे भारत एक्सप्रेसचा प्रारंभही मोदी यांनी आभासी माध्यमाद्वारे हिरवा झेंडा दाखवून केला. गोरखपूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामाची पायाभरणी आज त्यांनी केली. त्याआधी गीता प्रेसच्या शताब्दी सोहळ्याच्या सांगता समारंभात ते उपस्थित राहिले. यावेळी त्यांनी गीता-प्रेसच्या कार्याची प्रशंसा केली. प्रधानमंत्री आता वाराणशी या त्यांच्या मतदार संघाच्या दौऱ्यावर असून तिथं १२ हजार १०० कोटी रुपयांच्या त्यांच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे. विद्युतीकरण किंवा दुहेरीकरण पूर्ण झालेल्या तीन रेल्वेमार्गांचं लोकार्पणही मोदी करणार आहेत. यामुळे उत्तर प्रदेशातल्या रेल्वेमार्गांच १०० टक्के विद्युतीकरण पूर्ण होत आहे. वाराणशीतल्या मनकर्णिका आणि हरिश्चंद्र घाटांच्या पुनर्विकास कामाची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते होणार आहे. आज संध्याकाळी उशिरा वाराणशी मतदार संघातल्या भाजपा कार्यकर्त्यांची बैठक ते घेणार आहेत.