Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आपण ओबीसी असल्यामुळेच टीकेचे लक्ष्य बनलो असल्याचा छगन भुजबळ यांचा आरोप

मुंबई (वृत्तसंस्था) : आपण ओबीसी असल्यामुळेच शरद पवार यांनी आपल्या मतदार संघात सभा घेऊन टीका केली असा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. ते आज नाशिकमध्ये बातमीदारांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेलं बंड आपण नाही तर, शरद पवार यांच्या कुटुंबातले सदस्य अजित पवार यांनी, आणि सोबतच शरद पवार यांचे विश्वासू सहकारी प्रफुल्ल पटेल आणि दिलीप वळसे पाटील यांनीही केलं आहे असं ते म्हणाले. शरद पवार यांनी आपल्याला नाशिकमधून निवडणूक लढवायला सांगितलं होतं, मात्र येवल्यातल्या मतदारांनीच आपल्याला तिथून लढायची विनंती केली, आणि त्यानंतर आपण मतदारसंघात केलेल्या कामांमुळेच मतदारांनी सलग तीन वेळा निवडून दिलं, असं म्हणत त्यांनी शरद पवार यांनी कालच्या सभेत भुजबळ यांची निवड चूकल्याबाबत केलेल्या टीकेला उत्तर दिलं. आपण भापजासोबत जाण्याचा निर्णय कधीही घेतला नव्हता असा खुलासा शरद पवार यांनी केला असला, तरी त्यांनीच दोन वेळा भाजपा सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता असा दावाही भुजबळ यांनी केला. शरद पवार यांनी कालच्या सभेत जनतेची माफी मागितली, पण किती ठिकाणी अशी माफी मागणार आहात, अशी टीका त्यांनी केली.

मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ काल पहिल्यांदा नाशिकमध्ये पोहचले, त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांची मिरवणूक काढत स्वागत केलं. आपण राज्यातल्या शेतकरी, मजूर, महिला आणि बेरोजगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिली.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही काल मुंबईत भुजबळ यांची सदिच्छा भेट घेतली, आणि महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अलिकडच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी कालपासून राज्यव्यापी दौऱ्याला सुरूवात केली. या दौऱ्यातली पहिली सभा त्यांनी काल मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला या मतदारसंघात घेतली. भुजबळ यांची निवड करताना आपली चूक झाल्याचं म्हणत, त्यांनी येवलेकरांची माफीही मागीतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचार केल्याचं वाटत असेल, तर त्यांनी आपल्या सत्तेचा वापर करून चौकशी करावी आणि दोषी आढळले तर शिक्षा द्यावी असं आव्हानही पवार यांनी या सभेत प्रधानमंत्र्यांना दिलं होतं.

सुप्रिया सुळे यांनीही देवळाली मतदारसंघातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांची त्या उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णालयात भेट घेतली आणि आणि विचारपूस केली. आमदार सरोज आहिरे आधीअजित पवार यांना समर्थन दिलं होतं. मात्र त्यानंतर त्यांनी आपल्या भूमिका स्पष्ट केली नव्हती, आणि अचानक त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हायला लागलं होतं.

Exit mobile version