नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-तीनचं प्रक्षेपण आज दुपारी आंध्र प्रदेशातल्या श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून झालं. एल व्ही एम 3 उर्फ बाहुबली या अग्निबाणाच्या सहाय्यानं चांद्रयान तीन अंतराळात झेपावलं आणि त्याचा चंद्राकडे प्रवास सुरु झाला. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं ६४२ टन वजनाच्या बाहुबली अग्निबाणाच्या साह्यानं केलेल्या या प्रक्षेपणात लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूलचा समावेश आहे.
पहिल्या टप्प्यात घन इंधन, दुसऱ्या टप्प्यात द्रवरूप इंधन तर तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात द्रवरूप हायड्रोजन आणि द्रवरूप ऑक्सिजनचा वापर करण्यात आला होता. परिपूर्ण स्वयंचलित उड्डाण क्रम प्रणालीनं हे प्रक्षेपण झालं.
२०१९ च्या चांद्रयान-दोन मोहिमेत सॉफ्टवेअर बिघाडामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर कोसळलं होतं. त्यामुळे आताच्या लँडरमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. लँडर चंद्रावर अलगद उतरून तिथलं तापमान, तसंच भोवतालची कंपनं मोजून प्लाझ्मा घनतेचा अंदाज लावणार आहे; तर रोव्हर परिसरातल्या मूलभूत रचनेबाबत माहिती गोळा करणार आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी इस्रोच्या नियंत्रण कक्षातून या उड्डाणाचा अनुभव घेतला. भारताच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला असून ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे, असं जितेंद्र सिंग यांनी या उड्डाणानंतर सांगितलं. मोहिमेतल्या सदस्यांनी वाहनाच्या एकंदरीत वजन क्षमतेचा दर्जा सुधारून १०० टक्के यशाची हमी दिल्याचं चांद्रयान मोहिमेचे संचालक मोहन कुमार यांनी म्हटलं आहे. भारताची देशांतर्गत क्षमता आणि आत्म निर्भरता येत्या २५ वर्षांत भारत जागतिक पातळीवर नेतृत्व करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अनेक शास्त्रज्ञांनी, त्यांच्या कुटुंबियांनी तसेच अनेक नोंदणी केलेल्या विज्ञानप्रेमींनी इस्रोच्या बाहेर उभं राहून शिट्या आणि टाळ्या वाजवत हा नजारा पाहिला आणि आनंद साजरा केला. वार्ताहर कक्षात देश आणि परदेशातले २०० हून अधिक पत्रकार उपस्थित होते. इस्रोच्या ५४ महिला अभियंत्या आणि संशोधक यांचा या मोहिमेत थेट सहभाग होता.
चांद्रयान ३ चं यशस्वी उड्डाण हा भारताच्या अवकाश संशोधनात लक्षणीय मैलाचा दगड ठरल्याची प्रतिक्रिया द्रोपदी मुर्मू यांनी व्यक्त केली आहे. अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञानातल्या प्रगतीसाठी भारताच्या वचनबद्धतेचं हे द्योतक असल्याचं त्या म्हणाल्या.
उपराष्ट्रपती जगदीप धडखड यांनीही इस्रोच्या संशोधकांचं अभिनंदन केलं आहे. अवकाशविज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रातलं हे भारताचं असामान्य कर्तृत्व असून ते भारताच्या या क्षेत्रातल्या प्रगतीचं द्योतक असल्याचं ते म्हणाले. ही मोहीम म्हणजे भारताच्या अवकाश क्षेत्रासाठी एक नवा अध्याय असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. ही मोहीम प्रत्येक भारतीयाच्या स्वप्नांना आणि महत्त्वाकांक्षांना नवी उंची, भरारी देणारी असल्याचं ते म्हणाले. भारतीय शास्त्रज्ञांचे अथक प्रयत्न आणि निष्ठा याचं हे प्रतीक असल्याचं त्यांनी नमूद केलं.
‘चांद्रयान-3 मोहीम भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रातली ऐतिहासिक झेप ठरेल,’असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. चंद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वैज्ञानिक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केलं आहे. ही मोहीम भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रातल्या जिद्दीचं आणि चिकाटीचं प्रतीक आहे, असं ते म्हणाले.
या मोहिमेच्या यशानंतर आता इस्रो आदित्य एल वन मोहिमेचं नियोजन करत असल्याची माहिती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्सच्या संचालक डॉ अन्नपूर्णी सुब्रमन्यम यांनी दिली. आदित्य एल वन ही सूर्य आणि सूर्यमालेचं निरीक्षण करणारी भारताची पहिली अंतराळ मोहीम असेल, असं त्या म्हणाल्या.