Site icon साप्ताहिक एकच ध्येय

प्रधानमंत्री आवास योजनेच्या निकषात उत्पन्न मर्यादेत वाढ केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून प्रधानमंत्र्यांचे आभार

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्र –एमएमआर मध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी (EWS) प्रधानमंत्री आवास योजनेतील परवडणाऱ्या घरांसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे, उत्पन्नाची मर्यादा आता तीन लाखांवरुन सहा लाख रुपये करण्यात आली असून या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्री हरदिप सिंह सुरी यांचे आभार मानले आहेत. या निर्णयामुळे म्हाडा, सिडकोच्या घरांसाठी अर्ज करणाऱ्या लाखो नागरिकांना दिलासा मिळाला असून सर्वसामान्यांचं हक्काच्या घराचं स्वप्न साकार होण्यास मदत होणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) अंतर्गत मुंबई महानगर क्षेत्रासाठी आर्थिक दुर्बल घटकांसठी उत्पन्नाचे निकष तीन लाखांवरून सहा लाख रुपये करण्याची विनंती मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केंद्राकडे २१ जून २०२३ रोजी पत्राद्वारे केली होती, त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचा पाठपुरावा केला. या विनंतीला केंद्राने सकारात्मक प्रतिसाद देऊन उत्पन्नाच्या निकषात वाढ केली असल्याचे राज्य शासनाला कळविले आहे.

Exit mobile version