Site icon साप्ताहिक एकच ध्येय

अनुसूचित जातीच्या युवक–युवतींच्या कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी बार्टी आणि आयजीटीआरमध्ये सामंजस्य करार

पुणे : राज्यातील अनुसूचित जातीच्या एक हजार उमेदवारांना दरवर्षी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि सूक्ष्म, लहान आणि मध्यम उद्योग तंत्रज्ञान केंद्र, इंडो जर्मन टूल रूम (आयजीटीआर) औरंगाबाद यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.

बार्टीच्या निबंधक इंदिरा अस्वार व आयजीटीआरचे महाव्यवस्थापक आर.डी.पाटील यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. उपजिल्हाधिकारी तथा बार्टी कौशल्य विकास विभागाचे विभाग प्रमुख अनिल कारंडे, आयजीटीआरचे कौशल्य विकास वरिष्ठ प्रशिक्षण व्यवस्थापक जे.डी.बागुल, बार्टीचे प्रकल्प व्यवस्थापक महेश गवई, आयजीटीआरच्या पुणे प्रकल्प अधिकारी मेघा सौंदणकर आदी यावेळी उपस्थितीत होते.

राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांमधील कौशल्य विकास, त्यांना तांत्रिक ज्ञान देऊन कौशल्याच्यादृष्टीने सक्षम करणे, त्यांची रोजगारक्षमता वाढविणे आणि उद्योजकतेला चालना देणे हा या कराराचा उद्देश आहे. या भागीदारीद्वारे बार्टी व आयजीटीआर संयुक्तपणे अनुसूचित जाती समुदायाच्या गरजा आणि आकांक्षेनुसार कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविणार आहे. प्रशिक्षणार्थ्यांना सी.एन.सी टर्निंग, टूल ॲन्ड डायमेकिंग, मशिन मेंटेनन्स, वेल्डिंग, कॅड/कॅम आदी विषयाचे ६ ते १२ महिन्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

बार्टीच्या निबंधक श्रीमती अस्वार यांनी या सामंजस्य कराराबद्दल आनंद व्यक्त करुन राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांच्या सक्षमीकरण्याच्या दिशेने हे एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचे सांगितले.

आयजीटीआरचे महाव्यवस्थापक श्री. पाटील म्हणाले, अनुसूचित जातीच्या उमेदवारांना तांत्रिक प्रशिक्षण आणि नोकरीसाठी सहाय्यता प्रदान करण्यासाठी बार्टीसोबत भागीदारी करण्यात आली आहे. उमेदवारांना दर्जेदार कौशल्य विकास प्रशिक्षण आणि चांगल्या भविष्यासाठी नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी दोन्ही संस्था कायम प्रयत्नशील राहतील.

कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये उमेदवारांच्या नावनोंदणीसाठी जाहिरात आणि नोंदणी प्रक्रिया ऑगस्ट २०२३ मध्ये सुरू करण्यात येईल. नाव नोंदणी प्रक्रिया आणि कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दल अधिक माहितीसाठी, इच्छुक उमेदवारांनी https://barti.in व https://www.igtr-aur.org या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

सुनिल वारे, महासंचालक, बार्टी: बार्टी आणि आयजीटीआर यामध्ये झालेला सामंजस्य करार राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी कौशल्य विकास आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या संधी निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल आहे. अनुसूचित जातीतील अधिकाधिक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेऊन रोजगारक्षम व्हावे.

Exit mobile version