महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीचेही आवाहन
Ekach Dheya
बांधकाम कामगारांना सुरक्षिततेची साधने पुरविण्याचे कामगार विभागाचे निर्देश
पुणे : सध्या अतिवृष्टीचे दिवस पाहता बांधकाम व्यवसायिक, कंत्राटदारांनी बांधकामाच्या ठिकाणी दुर्घटना घडू नयेत यासाठी बांधकाम कामगारांना सुरक्षिततेची साधने व उपकरणे पुरवावीत, असे निर्देश कामगार विभागाने दिले आहेत. तसेच नोंदणी न केलेल्या बांधकाम कामगारांची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
बांधकाम व्यवसायिक, कंत्राटदार व नियोक्ता यांनीदेखील स्वतःची नियोक्ता म्हणून https://lms.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईनरित्या नोंदणी करून घ्यावी. सुरक्षिततेची सर्व साधने व उपकरणे बांधकाम कामगारांना पुरवून कोणतीही दुर्घटना होणार नाही याची दक्षता घ्यावी. या दिवसात जमिन व संरक्षक भिंती खचणे आदी घटना घडण्याची शक्यता असल्यामुळे बांधकाम कामगार ज्या ठिकाणी रहातात ती जागा त्यामुळे बाधित होईल किंवा कसे याची खातरजमा करुन बांधकाम कामगारांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करावी. बांधकाम कामगारांच्या आरोग्याच्यादृष्टीने सर्व सोयी-सुविधा त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी पुरवाव्यात.
सर्व बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या अनोंदीत बांधकाम कामगारांची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी करुन त्यांना मंडळामार्फत देय असलेल्या सुरक्षा संच, अत्यावश्यक संच, वैद्यकिय तपासणी व मध्यान्ह भोजन आदी योजनांचे लाभ मिळवून देण्यास बांधकाम व्यवसायिक, कंत्राटदार, व नियोक्ता यांनी सहकार्य करावे.
बांधकाम कामगारांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या बाबतीत निष्काळजीपणा आढळल्यास किंवा दुर्देवी अपघात होवून मनुष्यहानी झाल्यास, त्यास सर्वस्वी संबंधित बांधकाम व्यवसायिक, कंत्राटदार व नियोक्ता जबाबदार राहतील, असेही पुणे विभागाचे अपर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी कळविले आहे.