Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राजपत्रित अधिकारी महासंघाच्या मागण्यांबाबत लवकरच बैठक : मुख्य सचिव अजोय मेहता यांचे आश्वासन

मुंबई : राज्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत लवकरच बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आज महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुख्य सचिव श्री. मेहता यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे,अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस समीर भाटकर, उपाध्यक्ष इंजि. विनायक लहाडे, संघटन सचिव सुदाम टाव्हरे, महिला प्रतिनिधी वंदना गेवराईकर, मंत्रालय अधिकारी संघटनेचे विष्णू पाटील उपस्थित होते.

आतापर्यंतच्या सर्व मुख्य सचिवांचे महासंघास चांगले सहकार्य मिळाल्याचे यावेळी श्री. कुलथे यांनी सांगितले. ते म्हणाले की, श्री. मेहता यांचा बृहन्मुंबई महानगरपालिकेतील मोठा प्रशासकीय अनुभव राज्यातील अधिकाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी उपयुक्त ठरेल. मुख्यमंत्रीदेखील महासंघाच्या मागण्यांविषयी सकारात्मक असतात. मात्र, अजूनही काही प्रश्न प्रलंबित असून ते मार्गी लावण्यासाठी मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्यांनी भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

महासंघाच्या कार्यकारिणीची 4 जून रोजी बैठक असून त्यापूर्वी मुख्य सचिवांना महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घ्यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी महासंघाने मुख्य सचिवांना निवेदन दिले. त्यामध्ये 7 व्या वेतन आयोगातील वेतनत्रुटी अहवाल, सुधारित वेतनावर वाहतूक भत्ता, 5 दिवसांचा आठवडा,सेवानिवृत्तीचे वय केंद्र शासनाप्रमाणे 60 वर्षे करणे, सर्व रिक्त पदे भरणे, कंत्राटी पद्धतीने नेमणुका न करणे, प्रशंसनीय कामाबद्दल आगाऊ वेतनवाढ, महिला कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे बालसंगोपन रजा, अधिकाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर सेवासुविधा आदी मागण्यांचा समावेश आहे.

Exit mobile version