ज्ञानवापी मशिदीत भारतीय पुरातत्व विभागानं सुरु केलेल्या सर्वेक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं दिली दोन दिवसांची स्थगिती
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीत भारतीय पुरातत्व विभागानं आज सकाळपासून सुरू केलेल्या वैज्ञानिक सर्वेक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं दोन दिवसांची स्थगिती दिली. या सर्वेक्षणाला स्थगिती द्यावी, अशी याचिका मुस्लिम समुदायानं सर्वोच्च न्यायालयात केली होती. वाराणसीच्या जिल्हा सत्र न्यायालयानं शुक्रवारी दिलेल्या आदेशानुसार भारतीय पुरातत्व विभागानं ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाच्या कामाला आज सकाळी सुरुवात केली होती. या सर्वेक्षणासाठी पुरातत्व विभागाच्या ३२ जणांचं पथक सकाळी सातच्या सुमारास ज्ञानवापीत दाखल झालं होतं. या सर्वेक्षणाला मुस्लीम पक्षकारांचा विरोध दर्शवत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज झालेल्या सुनावणीवेळी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी भारतीय पुरातत्व खात्याला ज्ञानवापी इथं वैज्ञानिक सर्वेक्षण २६ जुलैपर्यंत संध्याकाळी ४ वाजेपर्यंत न करण्याचे आदेश दिले. तसंच या संदर्भात मुस्लिम समुदायाच्या याचिकाकर्त्यांना पुढील उपायांसाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात जाण्याच्या सूचना ही दिल्या आहेत. दरम्यान, ज्ञानवापी मशिद परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात ठेवला आहे. ज्ञानवापी मशिदीतील वादग्रस्त वाजूखाना परिसर वगळून इतर भागाचं सर्वेक्षणाचे आदेश वाराणसी जिल्हा सत्र न्यायालयानं दिले होते. याप्रकरणाची ४ ऑगस्टला होणाऱ्या सुनावणीवेळी सर्वेक्षणाचा अहवाल देण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.