मुंबई (वृत्तसंस्था) : अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतक-यांना तातडीनं मदत देण्यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सांगलीत आंदोलन केलं. द्राक्ष बागा शेतक-यांना तातडीनं भरीव मदत द्यावी, पीक विम्याचे निकष बदलावे या प्रमुख मागण्या संघटनेनं जिल्हाधिका-यांकडे केल्या.
सरकारनं याकडे दुर्लक्ष केलं, तर तीव्र आंदोलन करु, असं संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी सांगितलं. जालना जिल्ह्यात तेहतीस टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या सोयाबीन, मका, बाजरी आणि कापसाचे पंचनामे महसूल आणि कृषी विभागानं सुरू केले आहेत. पालकमंत्री बबनराव लोणीकर, जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी बदनापूर तालुक्यातल्या भराडखेडा इथं नुकसानग्रस्त भागाची पहाणी केली.
कोल्हापूर जिल्ह्यात पुरामुळे झालेली नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनानं राज्य शासनाकडे दोनशे सोळा कोटी रुपयांची मागणी केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गडचिरोली जिल्ह्यातल्या कोरची तालुक्याला परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला असून, धानपिकाचं नुकसान झालं आहे. हलक्या धानाची कापणी होऊन धानाच्या शेतात ठेवलेल्या कडपांचं सर्वाधिक नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचं काम जिल्हाधिका-यांच्या आदेशानं आजपासून सुरु झालं. 8 नोव्हेंबरपर्यंत परिपूर्ण अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांनी दिले आहेत.
बीड जिल्ह्यात पिकांचे पंचनामे करण्यासाठी जिल्हाधिकारी आस्ती कुमार पांडेय यांनी तालुका स्तरावर समिती गठित केली आहे. परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं आतोनात नुकसान झाले आहे. या पिकांचे पंचनामे उद्यापासून करण्यात येणार आहेत.
त्यासाठी तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांना प्रत्येकी एक गाव देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी आज दिली. लातूरमधे औसा इथं पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
प्रशासनानं या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत, अशा सुचना आमदार अभिमन्यू पवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. पुणे जिल्ह्यातल्या शेतकरी नुकसानीचे पंचनामे चार दिवसात पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.