भारताच्या तंत्रज्ञानयुगात सेमीकंडक्टर्स आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राची भूमिका फार मोठी असेल : केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांचे प्रतिपादन
Ekach Dheya
स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच, सेमीकंडक्टर्सच्या क्षेत्रातील आपले प्रयत्न अत्यंत कमी वेळात यशस्वी झाले आहेत : केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर
नवी दिल्ली : सेमीकॉन इंडिया 2022 या परिषदेला मिळालेल्या यशानंतर, डिजिटल भारत महामंडळाचा स्वतंत्र व्यापार विभाग असलेल्या भारतीय सेमीकंडक्टर अभियानातर्फे आता 28 जुलै ते 30 जुलै 2023 या कालावधीत गांधीनगर येथील महात्मा मंदिर येथे सेमीकॉन इंडिया 2023 या महत्त्वाच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय सेमीकंडक्टर परिसंस्थेला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
या परिषदेविषयी माहिती देणाऱ्या कर्टन रेझर कार्यक्रमाचा भाग म्हणून गांधीनगर येथील महात्मा मंदिर येथे एक प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून त्यात सेमीकंडक्टर उद्योगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानांचे दर्शन घडवण्यात आले आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान तसेच कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या उपस्थितीत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांच्या हस्ते आज या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले, “सेमीकॉन इंडिया प्रदर्शनाच्या माध्यमातून भारतीय युवक आणि या तंत्रज्ञानाशी संबंधित लोकांना खूप काही शिकता येणार आहे. भारतीय तंत्रज्ञानयुगाच्या वाटचालीत सेमीकंडक्टर्स आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राला फार मोठी भूमिका निभावावी लागेल. स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच, अशा प्रकारचे आपले प्रयत्न केवळ 15 महिन्यांच्या थोडक्या वेळात यशस्वी झाले आहेत असे ते म्हणाले. आपल्या देशाने गेल्या 70 वर्षांमध्ये या संधीकडे दुर्लक्ष केले किंवा आपण त्यात अयशस्वी झालो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील या परिसंस्थेमध्ये रचनेतील नवोन्मेष, संशोधन, प्रतिभा,पॅकेजिंग आणि फॅब्स यांचा समावेश आहे आणि भारतीय सेमीकंडक्टर परिसंस्थेला आणखी चालना देण्यासाठी आपण या सर्वांची एकमेकांशी जोडलेली पुरवठा साखळी उभारण्याचा प्रयत्न करत आहोत असे ते म्हणाले.
हे प्रदर्शन 30 जुलै 2023 पर्यंत सुरु राहणार असून त्यात सेमीकंडक्टर संरचना स्टार्ट अप्स आणि प्रस्थापित बहुराष्ट्रीय कंपन्या, सेमीकंडक्टर पुरवठा साखळी, उपकरण निर्मिती, इलेक्ट्रॉनिक्स उपकरण निर्माते, शिक्षण क्षेत्र, केंद्र तसेच राज्य सरकारी प्रयोगशाळा यामधील 80 हून अधिक सहभागी त्यांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानविषयक प्रगतीचे दर्शन घडवणार आहेत.परिषदेत भाग घेणाऱ्या काही महत्त्वाच्या कंपन्यांमध्ये मायक्रॉन, अप्लाईड मटेरियल्स, एलएएम रिसर्च, इंटेल, क्वालकॉम, टेक्सास इन्स्ट्रुमेन्ट्स, एसटीमायक्रो इलेक्ट्रॉनिक्स, एनएक्सपी सेमीकंडक्टर्स, इन्फीनीऑन, एएमडी, एनव्हीआयडीआयए, ॲनालॉग डीव्हाईसेस, रेनेसास, सॅमसंग, कडेन्स डिझाईन सिस्टिम्स, मॉर्फिंग मशीन्स, इनकोर सेमीकंडक्टर्स, सांख्या लॅब्स,व्हिस्ट्रॉन,फॉक्सकॉन, लावा,डेल,व्हीव्हीडीएन, आयआयएससी बंगळूरू तसेच देशभरातील आयआयटी संस्था यांचा समावेश आहे.