केंद्र सरकारच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव मांडण्याचा विरोधकांचा निर्णय
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून संसदेत गोंधळ सुरू असताना लोकसभेत विरोधी पक्षांनी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस सदस्य गौरव गोगोई आणि बीआरएस सदस्य नामा नागेश्वर राव यांनी अविश्वास प्रस्ताव मांडण्याची नोटीस दिली. सभापती ओम बिरला यांनी ही नोटीस स्वीकारली असून अविश्वास प्रस्ताव मांडण्याचा दिवस आणि वेळ सर्व पक्षांशी चर्चा करुन ठरवण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर जनतेचा विश्वास असल्याचं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, संसदेच्या शेवटच्या कार्यकाळात विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे. जनताचं त्यांना धडा शिकवेल. केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल म्हणाले की, सरकार अविश्वास प्रस्तावासह कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार असून, मणिपूरच्या मुद्द्यावरही सरकार चर्चा करण्यास तयार आहे. मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन सभागृहांमधे आजही गदारोळ झाला.
लोकसभेत कामकाज सुरु होताच काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक आणि इतर पक्षांचे सदस्य सभापतींसमोरच्या मोकळ्या जागेत उतरले. आणि घोषणा देऊ लागले. सत्ताधारी बाकावरून राजस्थानातले काही भाजपा खासदार अशोक गहलोत सरकारच्या निषेधात घोषणा देत होते. तर बंगालमधले भाजपा खासदार तृणमूल काँग्रेस सरकारच्या विरोधात घोषणा देत होते. सदस्यांनी शांत रहावं, असं आवाहन सभापती ओम बिर्ला यांनी वारंवार केलं मात्र गदारोळ चालूच राहिला आणि १२ वाजेपर्यंत कामकाज तहकूब करावं लागलं. राज्यसभेत अध्यक्ष जगदीप धनखड यांनी सभागृहाच्या कामकाजात सुरुवात करतानाच सांगितलं की, मणिपूर प्रश्नावरून नियम २६७ अन्वये चर्चेचे अनेक प्रस्ताव प्राप्त झाले आहेत मात्र सरकार अल्पकालीन चर्चेला तयार आहे. या प्रकरणी काल आपल्याला बोलू दिलं नाही, अशी तक्रार काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. त्याचवेळी विरोधी आणि सत्ताधारी बाकावरून घोषणा प्रतिघोषणा सुरु झाल्या. गदारोळामुळे अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित केलं. दोन्ही सभागृहात आज कारगिल दिनानिमित्त शहिदांना आदरांजली वाहण्यात आली.