स्मार्ट सिटीच्या नावाखाली पिंपळे सौदागर भागातील रस्त्यांची दुरावस्था
Ekach Dheya
पिंपरी : पिंपळे सौदागर पोलीस चौकी बाजूकडील महादेव मंदिराकडून पि.के. इंटरनॅशनल स्कूलकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत, ह्या खड्ड्यात पावसाचे पाणी साठले आहे. त्यामुळे खड्डयांचा अंदाज वाहनचालकांना येत नाही तसेच खड्डे चुकविण्याच्या नादात दररोज येथे छोटे मोठे अपघात होत आहेत.
गेल्या आठवड्यामध्ये कुणाल आयकॉन रोड पिंपळे सौदागर भागातील कै.बाळासाहेब कुंजीर ग्राउंड लगत असलेल्या कन्स्ट्रक्शन साईटच्या बाजूचा रस्ता खचला होता. तसेच अनेक ठिकाणी असे प्रकार भविष्यात घडतील, होणाऱ्या प्रकाराला फक्त प्रशासन जबाबदार असेल. कारण प्रत्येक साईटचा परवाना हा पालिका जबाबदारी घेऊन देत असते. रस्ते, लाईट, पाणी, आरोग्य या सुविधा पुरवणे स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रथम कर्तव्य आहे आणि ह्या कर्तव्यास कामचुकारपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी येत्या काळात जन आंदोलन छेडण्याचा इशारा देत आहे.
स्मार्ट सिटी आहे कि खड्डे सिटी आहे ते तर स्पष्ट करा. आयुक्त तथा प्रशासक श्री.शेखरसिंह म्हणतात कि शहरातील खड्डे तातडीने आम्ही बुजविण्यात येणार आहे, मग गेल्या आठवड्यापासून येथे तर कोणी स्थापत्य विभागाचा एकही अभियंता फिरकला नाही असे येथील नागरिक सांगतात. तातडीने येथील खड्डे बुजवा, अन्यथा ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना तरुणांना घेऊन आंदोलन करण्यात येईल. असा इशारा सामाजिक कार्यकर्ते विशाल जाधव यांनी आयुक्तांना दिला आहे.