Site icon साप्ताहिक एकच ध्येय

नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करुन महसूल सप्ताह यशस्वी करा – विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे : महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा, राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळावा यासाठी महसूल सप्ताहामध्ये अधिकाधिक नागरिकांना सहभागी करुन घ्यावे, असे आवाहन विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केले. शासनाच्या कामकाजाप्रती नागरिकांचा विश्वास वृद्धींगत होईल यावर लक्ष केंद्रित करत नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करुन सप्ताह यशस्वी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

राज्य शासनाच्यावतीने १ ऑगस्टपासून आयोजन करण्यात येत असलेल्या महसूल सप्ताहानिमित्त राबवावयाच्या विविध उपक्रमांचा पुणे विभागातील जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधून आढावा घेताना श्री. राव बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, विभागीय आयुक्तालयाच्या सामान्य प्रशासन उपायुक्त वर्षा लड्डा ऊंटवाल, महसूल उपायुक्त रामचंद्र शिंदे यांच्यासह विविध विभागस्तरीय अधिकारी उपस्थित होते. सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

विविध कार्यक्रमाचे आयोजन

१ ते ७ ऑगस्ट २०२३ या कालावधीत सातही दिवसांत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. या कालावधीत महसूल दिन साजरा करण्यासह महसूल सप्ताह शुभारंभ, युवा संवाद, एक हात मदतीचा, जनसंवाद, सैनिक हो तुमच्यासाठी, महसूल संवर्गातील कार्यरत आणि सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा संवाद तसेच महसूल सप्ताह सांगता समारंभ इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

श्री. राव यावेळी म्हणाले, शासनाच्या सर्वच उपक्रमांमध्ये पुणे विभाग नेहमीच अग्रेसर राहिला असून, महसूल सप्ताह आयोजनातही विभागाने आपला नावलौकिक वाढवावा. महसूल सप्ताहात नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात लाभेल यासाठी कल्पकतेने वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करावे. विभागातील सर्व तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी तसेच महसूल कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा आणि उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहनही श्री.राव यांनी केले.

प्रसिद्धी माध्यमांचे सहकार्य घ्यावे

माहिती व जनसंपर्क विभागाच्यावतीने शासनाच्या विविध योजनांची, ध्येय धोरणांची सकारात्मक प्रसिद्धी करण्यात येते. महसूल सप्ताहाच्या ठळक आणि प्रभावी प्रसिद्धीसाठी जिल्हा माहिती कार्यालय आणि प्रसिद्धी माध्यमांचे सहकार्य घ्यावे. सप्ताहात आयोजित कार्यक्रमांची माहिती नागरिकांनी व्हावी यासाठी जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषद घ्यावी. सर्व तालुका, उपविभागीय आणि जिल्ह्याच्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांची माहिती फ्लेक्स बॅनर्सद्वारे ठळकपणे प्रदर्शित करावी अशा सूचनाही विभागीय आयुक्तांनी दिल्या.

Exit mobile version