मोशी येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन
Ekach Dheya
पुणे : महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या 250 मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह पिंपरी-चिंचवड मोशी या संस्थेत 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक मुलींनी प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग, शारिरीकदृष्ट्या दिव्यांग व अनाथ आदी प्रवर्गातील 11 वी, बिगर व्यवसायिक आणि व्यवसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थींना वसतिगृहात प्रवेश देण्यात येणार आहेत. विद्यार्थीनी बाहेरगावातील मात्र पुणे, पिंपरी-चिंचवड, मोशी प्राधिकरण परिसरात शिकणाऱ्या असाव्यात.
शासकीय वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थींना विनामुल्य भोजन व निवासाची व्यवस्था असून क्रमीक पुस्तके, शैक्षणिक साहित्य, गणवेश व कॉलजचे ड्रेसकोड इत्यादी शासनाने ठरवून दिलेल्या आर्थिक मर्यादेपर्यंतची रक्कम विद्यार्थींनींच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते. तसेच दरहा 900 रुपये निर्वाह भत्ता अदा करण्यात येतो. शैक्षणिक साहित्य भत्ता 4 हजार रुपये, छत्री, रेनकोट, गमबूट भत्ता 500 रुपये, गणवेश भत्ता 2 हजार रुपये, प्रकल्प (प्रोजेक्ट) भत्ता 1 हजार रुपये आदी देण्यात येते. शिवाय संगणक, ग्रंथालय सुविधा, क्रीडासाहित्य आदी अनेक सुविधा येथे उपलब्ध आहेत.
प्रवेशासाठी मागील वर्षाची गुणपत्रिका, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र, वडिलांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, महाविद्यालयाचा बोनाफाईड दाखला, अधिवास प्रमाणपत्र, आधारकार्ड, शिधापत्रिका सोबत आणाव्यात. शासकीय वसतिगृहाचे प्रवेश अर्ज विनामुल्य मिळतील. अधिक माहितीसाठी 250 मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, पिंपरी-चिंचवड मोशी (भ्र. ध्व. क्र. 7774001926 आणि 7507590647) येथे संपर्क साधावा, असे आवाहन वसतिगृहाच्या गृहप्रमुख श्रीमती मीनाक्षी नरहरे यांनी केले आहे.