भारताचं चांद्रयान ३ हे अंतराळयान आज संध्याकाळी ७ वाजता चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल – इस्रो
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): भारताचं चांद्रयान ३ हे अंतराळयान आज संध्याकाळी ७ वाजता चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल, त्यासाठी आपण सज्ज आहोत असं इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं म्हटलं आहे. या यानानं आत्तापर्यंत चंद्रपर्यंतचे सुमारे दोन तृतीयांश अंतर पार केलं आहे. चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर ते अनेक वेळा चंद्राभोवती प्रदक्षिणा घालेल, आणि हळूहळू चंद्राच्या पृष्ठभागाच्या जवळ पोहचेल.
चंद्राच्या पृष्ठभागापासून १०० किमीच्या कक्षेपर्यंत पोहोचल्यावर, या यानापासून लँडर आणि रोव्हर वेगळे होतील, आणि चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरवण्यासाठीची प्रक्रिया सुरू होईल. या यानाने उड्डाण केल्यापासून ४० दिवसांच्या प्रवासानंतर म्हणजेच येत्या २३ ऑगस्टच्या सुमाराला चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ हे यान अलगद उतरवले जाणार आहे. यामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवणारा भारत जगातला पहिला देश ठरणार आहे, तर चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवणारा जगातला चौथा देश ठरणार आहे.