मुंबई (वृत्तसंस्था) : धुळे जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागात कुठलाही वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसताना कार्यरत असणाऱ्या बोगस डॉक्टरांविरुध्द धुळे जिल्हा आरोग्य विभागानं कारवाई सुरु केली आहे. या कारवाई अंतर्गत शिरपूर तालुक्यातील बोराडी, मालकातर आणि कोडीद या आदिवासी बहुल गावांमध्ये ४ डॉक्टरांचे दवाखाने काल सील करण्यात आले.
या दवाखान्यांमधून मोठ्या प्रमाणात ऑलोपॅथी औषधांचा साठा जप्त करण्यात आला आहे. गेल्या पंधरा दिवसांत १९ गावांमधल्या २८ बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे. यापैकी एका डॉक्टराविरुध्द फौजदारी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. २० जणांचे दवाखाने सील केले आहेत, तर ७ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.