संरक्षण, सुरक्षा आणि कृषी क्षेत्रासह विविध क्षेत्रांमध्ये धोरणात्मक भागीदारी करण्यावर भारत आणि ग्रीस यांच्यात सहमती
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): भारत आणि ग्रीस देशांत संरक्षण, सुरक्षा आणि कृषी क्षेत्रासह विविध क्षेत्रांमध्ये धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करणं,२०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पटीनं वाढवण्यावर एकमत झाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ग्रीसचे प्रधानमंत्री किरियाकोस मित्सोटाकिस यांची अथेन्समध्ये भेट घेतली. त्या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. दोन्ही देशांमध्ये गुन्हेगारांचं हस्तांतरण, स्थलांतरणाबाबत करार केला जाणार असल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी वार्ताहर परिषदेत दिली.
भारत आणि ग्रीस देशांत सुरक्षा, पायाभूत सुविधा, कृषी, शिक्षण आणि कौशल्य विकास यांसह अन्य क्षेत्रांतही परस्पर सहकार्य करत क्षेत्रांत धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसंच संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्यावर एकमत झालं. तसंच उभय देशांत लष्करी संबंधांव्यतिरिक्त संरक्षण औद्योगिक सहकार्य मजबूत करण्यावरही सहमती झाल्याचं प्रधानमंत्री मोदी सांगितलं.
दहशतवाद आणि सायबर सुरक्षेच्या क्षेत्रातही दोन्ही देशांनी सहकार्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली आणि त्यावर परस्परांना मदत करण्याचा निर्णय झाला.यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावर संवाद मंच स्थापन करण्यावर विचार झाल्याची माहिती प्रधानमंत्री मोदी यांनी दिली. दोन्ही देशांत होणार व्यापारात दुप्पटीनं वाढ करण्याचं आमचं उद्दिष्ट्य आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धानंतर तसंच भविष्यात येणाऱ्या आव्हानांना दोन्ही देश एकत्रितपणं सामोरे जातील, असं प्रतिपादन ग्रीसचे प्रधानमंत्री किरियाकोस मित्सोटाकिस यांनी केलं. ग्रीसचे राष्ट्रपती कॅटरिना साकेलारोपौलो यांचीही प्रधानमंत्री मोदी यांनी भेट घेतली. यावेळी प्रधानमंत्र्यांना ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर या पुरस्कारानं सन्मानित केलं.