मुंबई (वृत्तसंस्था) : वर्सोवा-विरार सी लिंक प्रकल्पाला संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन जपान सरकारनं दिलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज जपानचे केंद्रीय आर्थिक, व्यापार आणि उद्योग मंत्री यासुतोशी निशिमुरा यांची भेट घेतली. मुंबई ट्रान्सहार्बर लिंक, मेट्रो 3 प्रकल्पातले अडथळे दूर केल्याबद्दल निशिमुरा यांनी यावेळी फडनवीस यांचे आभार मानले. जपान जी-7 चं नेतृत्व करीत असून, भारत जी-20 चे नेतृत्व करीत आहे. त्यामुळे हे दोन देश जागतिक पातळीवर मोठी भूमिका बजावू शकतात, असं निशिमुरा म्हणाले.
इशिकावाचे वाईस गव्हर्नर अतूको निशिगाकी यांनी आज फडनवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सुपा इंडस्ट्रियल पार्कमध्ये गुंतवणूक करण्याचा मनोदय व्यक्त केला. मित्सुबिशीचे उपाध्यक्ष हिसाहिरो निशिमोटो यांचीही फडनवीस यांनी भेट घेतली. तळेगाव इथं मित्सुबिशीने गुंतवणूक केली असून महाराष्ट्रात आणखी विस्तार करायला मित्सुबिशीनं अनुकूलता दर्शविली आहे. सॉफ्टवेअर क्षेत्रात पुण्यात आणखी गुंतवणूक करणार असल्याचं सुद्धा मित्सुबिशीच्या वतीनं यावेळी सांगण्यात आलं. जपानच्या प्रधानमंत्र्यांचे विशेष सल्लागार मासाफुमी मोरी, तसंच एनटीटी डेटा, जायका, जेरा, या कंपन्यांच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांचीही फडनवीस यांनी भेट घेतली.