भारत सात टक्के सरासरी वाढ साध्य करण्याच्या मार्गावर असल्याचं एन चंद्रशेखरन यांचं प्रतिपादन
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): भारत विकासाचा दीपस्तंभ म्हणून उभा आहे आणि पुढील दशकांमध्ये देश सात टक्के सरासरी वाढ साध्य करण्याच्या मार्गावर असल्याचं आजचे B20 इंडियाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी सांगितलं. ते नवी दिल्लीत सुरू तीन दिवसीय शिखर परिषदेत बोलत होते. देश सध्या डिजिटल आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स संक्रमण, ऊर्जा संक्रमण आणि जागतिक मूल्य आणि पुरवठा साखळी संक्रमण या तीन संक्रमणांमधून मार्गक्रमण करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. या परिषदेला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर, जी २० इंडिया शेर्पा अमिताभ कांत यांच्यासह विविध देशांचे व्यापार मंत्री आणि अनेक व्यापारी नेते सहभागी होतील.
येत्या २७ तारखेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विशेष अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. आज शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी, बी २० भारताची प्राधान्यं आणि जगासाठी भारताकडून आलेल्या शिफारसींसह सात सत्रं आयोजित आहेत. या परिषदेला मास्टरकार्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी मायकेल मिबॅच आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अध्यक्ष बोर्गे ब्रेंडे यांच्यासह अनेक जागतिक आणि भारतीय व्यावसायिक नेते उपस्थित राहतील. या परिषदेची मुख्य संकल्पना रेझ म्हणजेच जबाबदार, प्रवेगक, नाविन्यपूर्ण, शाश्वत, समान व्यवसाय ही असणार आहे.