Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या दृष्टीनं शासनस्तरावर प्रयत्न करण्याची मंत्री छगन भुजबळ यांची ग्वाही

मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कांद्याला हंगामानुसार योग्य हमीभाव मिळावा यासाठी, तसंच कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या दृष्टीनं शासनस्तरावर प्रयत्न करण्याची ग्वाही, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. त्यांनी आज नाशिक जिल्ह्यात लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विंचूर उपबाजार समितीला भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.

कांद्याच्या प्रश्नाबाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्याशी चर्चा केली आहे. नाशिक जिल्ह्यात नाफेडची कांदा खरेदी केंद्रं वाढवण्याची मागणी केली असून ही केंद्रं सुरू केली जात आहेत. कांद्यासाठी ३५० रूपये प्रति क्विंटल अनुदान, दोन टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलं जाईल, असं भुजबळ यांनी सांगितलं.

नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या दरावरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी काल रात्री नाशिकला जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. कांद्याच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी येत्या दोन-तीन दिवसात मुख्यमंत्र्यांच्या दालनात शेतकरी, व्यापारी आणि बाजार समिती संचालकांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली जाईल, असं त्यांनी सांगितलं. कांदा चाळी वाढवण्याच्या दृष्टीनं छोट्या कांदा चाळींसाठी देखील अनुदान देण्याचा विचार असल्याचं महाजन यांनी सांगितलं.

Exit mobile version