Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आदित्य एल-1, या पहिल्या भारतीय निरीक्षक उपग्रहाचं येत्या २ सप्टेंबरला प्रक्षेपण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अंतराळात सोडला जाणार असलेल्या आदित्य एल-1, या पहिल्या भारतीय निरीक्षक उपग्रहाचं प्रक्षेपण येत्या २ सप्टेंबरला होणार आहे. येत्या शनिवारी सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी आंध्रप्रदेशातल्या श्रीहरी कोटा इथल्या अंतराळ स्थानकावर हे प्रक्षेपण केलं जाईल, असं ट्वीट इस्रो, अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं केलं आहे.

पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर अंतरावर असलेल्या, एल-1 लॅग्रेंज बिंदूच्या भोवती प्रभामंडळ कक्षेत हा उपग्रह सोडला जाईल. लॅग्रेंज बिंदूपर्यंत पोचायला त्याला चार महिने लागतील. या कक्षेमुळे आदित्य एल -1 ला आकाशातल्या किंवा अवकाशातल्या ग्रहणासारख्या कोणत्याही घडामोडींचा अडथळा न येता सौर घडामोडींचं निरीक्षण करणं शक्य होईल. सौर वारे आणि सूर्याच्या वातावरणाचा अभ्यासही आदित्य एल-1 करणार आहे. फोटोस्फिअर, क्रोमोस्फिअर,  तसंच कोरोना या सूर्याच्या बाह्यस्तराचं निरीक्षण करण्यासाठी आदित्य एल-1  वर सात पेलोड्स असतील.

श्रीहरी कोटातल्या गॅलरीतून या प्रक्षेपणाचे साक्षीदार होण्याकरता नागरिकांनाही इस्रोनं निमंत्रित केलं आहे. त्यासाठी lvg.shar.gov.in/VSCREGISTRATION या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल.

Exit mobile version