Site icon साप्ताहिक एकच ध्येय

घरगुती गॅस सिलेंडरची किंमत २०० रुपयांनी स्वस्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) स्वयंपाकाच्या गॅसच्या सिलेंडरचा दर दोनशे रुपयांची कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. त्यामुळं मुंबईत घरगुती वापराच्या सिलेंडरची किंमत ९०२ रुपये होईल. आज नवी दिल्लीत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. सर्व ग्राहकांसाठी ही दर कपात लागू आहे, त्यामुळे उज्ज्वला लाभार्थ्यांना सिलेंडरमागे एकूण चारशे रुपयांचा लाभ मिळेल, असं त्यांनी सांगितलं. यामुळं उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना ७०२ रुपयात सिलेंडर मिळेल. उज्ज्वला योजनेअंतर्गत सरकार ७५ लाख नव्या जोडण्या देणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. चांद्रयान-३ मोहिमेच्या यशाबद्दल आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला, असं त्यांनी सांगितलं.

सिलिंडरच्या किंमती कमी झाल्यानं भगिनींना फायदा होईल आणि त्यांचं आयुष्य अधिक सुकर होईल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांच्या कुटुंबात आनंद निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारनं हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सिलिंडरचे दर कमी केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. रक्षाबंधनाच्या निमित्तानं ही मोठी भेट केंद्र सरकारनं दिली आहे. गरीब आणि मध्यमवर्गाला याचा मोठा फायदा होईल, असं ते म्हणाले.

Exit mobile version