Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यातील ५० लाख शेतकऱ्यांना विमा रक्कम तात्काळ मिळावी – मुख्यमंत्र्यांचे केंद्र शासनाला निवेदन

नवी दिल्ली : अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे, तसेच राज्यातील 50 लाख शेतकऱ्यांना विम्याची रक्कम तात्काळ मिळावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र शासनाकडे केली आहे.

महाराष्ट्रातील ओल्या दुष्काळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा सविस्तर प्राथमिक अहवाल गृहमंत्र्यांना सादर केला व शेतकऱ्यांना केंद्र शासनाने मदत करावी यासाठीचे निवेदन दिले.

महाराष्ट्रातील 325 तालुक्यात अनेक ठिकाणी 90 ते 100 टक्के शेतीचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची गरज आहे असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी,  राज्यातील सुमारे 50 लाख शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आहे. या सर्व शेतकऱ्यांना विम्याची रक्कम तात्काळ मिळावी तसेच केंद्रीय पाहणी पथक महाराष्ट्रात लवकरात-लवकर पाठवावे, अशी विनंती केली.

गृहमंत्री घेणार विमा कंपन्यांची बैठक

राज्यातील 50 लाख शेतकऱ्यांना विम्याची रक्कम तात्काळ मिळावी, यासाठी गृहमंत्री अमित शहा हे लवकरच विमा कंपन्यांची बैठक घेणार असून शेतकऱ्यांना ही मदत लवकरात-लवकर मिळेल अशी ग्वाही गृहमंत्र्यांनी दिली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक लवकरच महाराष्ट्रात पाठविले जाईल यासंदर्भात अमित शहा यांनी सचिवांशी चर्चा करून महाराष्ट्रात केंद्रीय पथक पाठविण्याचे निर्देश दिले आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Exit mobile version