Site icon साप्ताहिक एकच ध्येय

‘आयुष्मान भव’ मोहिमेचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आरोग्य सेवेपासून कोणतंही गाव वंचित राहू नये. देशातले सर्व नागरिक निरोगी असतील तरच निरोगी भारताचं स्वप्न साकार होईल, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. त्यांच्या हस्ते आज आयुष्मान भव मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. आयुष्मान भव मोहीम हा ग्रामीण आणि शहरी भागातला आरोग्य विभाग, इतर सरकारी विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयानं ग्रामपंचायतींनी चालवलेला उपक्रम आहे. देशातल्या सर्व नागरिकांना आरोग्य सुविधांचा लाभ मिळावा, हा या मोहिमेचा उद्देश आहे. आयुष्मान – आपल्या दारी, आरोग्य केंद्रांवर आयुष्मान मेळावे आणि प्रत्येक गाव तसंच पंचायतीमध्ये आयुष्मान सभा, असं या मोहिमेचं स्वरुप आहे. लोकसहभाग आणि लोकप्रतिनिधींच्या सहभागानं क्षयरोगासारखे संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजार, सिकलसेल सारख्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी लोकांना जागरूक केलं जाऊ शकतं, असं राष्ट्रपतींनी सांगितलं. निरोगी बालक, निरोगी राष्ट्र हे दीर्घकालीन उद्दिष्ट साध्य करण्यासाठी यात शालेय आरोग्य तपासणीही केली जाणार आहे.  या उपक्रमाचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कौतुक केलं.

Exit mobile version