संसदेचं पाच दिवसांचं विशेष अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरु होणार
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): संसदेचं पाच दिवसांचं विशेष अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरु होणार आहे. पहिल्या दिवशी लोकसभेत ७५ वर्षांच्या संसदीय प्रवासावर चर्चा होईल, त्यामध्ये आजवरची कामगिरी, अनुभव, आठवणी आणि शिकवण याविषयी सदस्य आपले विचार मांडतील. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबतचं विधेयक या अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. याशिवाय विधिज्ञ सुधारणा विधेयक, नियतकालिकांचे प्रेस आणि नोंदणी विधेयक आणि टपाल कार्यालय विधेयक या अधिवेशनात चर्चेसाठी घेतलं जाणार आहे, राज्यसभेत ही विधेयकं आधीच मंजूर झाली आहेत.अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सुरू होण्यापूर्वी १७ सप्टेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होणार आहे. यासाठी संबधित नेत्यांना आमंत्रणं पाठवण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी समाजमाध्यमांद्वारे दिली आहे. येत्या १८ सप्टेंबरला संसदेचं अधिवेशन सुरू होणार आहे.