सरकारी कार्यालयांमधील स्वच्छता आणि अडगळ काढून टाकण्यासाठी विशेष अभियान टप्पा ३.० पोर्टल सुरू
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): देशभरातल्या सरकारी कार्यालयांमधे स्वच्छता करणे आणि अडगळ काढून टाकणे या उद्देशाने विशेष अभियान टप्पा- ३.० राबवण्यात येणार आहे. त्यावर देखरेख करण्यासाठी एका पोर्टलचं उद्घाटन आज नवी दिल्लीत केंद्रीय कार्मिक, गाऱ्हाणी आणि निवृत्तीवेतन विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्रसिंग यांच्या हस्ते झालं. येत्या २ ऑक्टोबरपासून ३१ ऑक्टोबरपर्यंत विशेष स्वच्छता अभियानाचा तिसरा टप्पा राबवण्यात येणार असून त्यासाठीची पूर्वतयारी उद्यापासून सुरु होणार आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे कार्यसंस्कृतीत सकारात्मक बदल घडतो असं डॉ. सिंग यावेळी म्हणाले. या तिसऱ्या टप्प्यात सुमारे दीड लाख ठिकाणच्या इमारती- आस्थापनांमधली अडगळ काढून टाकून सुमारे १०० लाख चौरस फूट जागा मोकळी करण्यात येणार आहे. त्यातून निघणाऱ्या भंगाराच्या विक्रीतून सुमारे ४०० कोटी रुपये महसूल मिळेल असा अंदाज आहे, अशी माहिती केंद्रीय प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी निवारण विभागाचे सचिव व्ही श्रीनिवास यांनी दिली. मोहिमेच्या मागच्या टप्प्यातल्या कामाचा अहवाल आणि या टप्प्यासाठी मार्गदर्शक सूचना या वेळी प्रसिद्ध करण्यात आला.