Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आर्थिक सायबर गुन्हेगारांपासून सावध राहण्यासाठी ज्येष्ठांना मार्गदर्शन

कर्वे समाजकार्य महाविद्यालयात ज्येष्ठ नागरिक दिनाचे आयोजन

पुणे : ज्येष्ठ नागरिकांनी सायबर गुन्हेगारांद्वारे होणाऱ्या आर्थिक फसवणुकीपासून वाचण्यासाठी सतर्क रहावे. फसव्या मोबाईल कॉल, लिंकला प्रतिसाद देणे टाळावे, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक दिनाच्या अनुषंगाने समाज कल्याण विभाग तसेच कर्वे समाजकार्य महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आर्थिक सायबर गुन्हे मार्गदर्शन व परिसंवाद’ कार्यक्रमात करण्यात आले.

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त कर्वे समाजकार्य महाविद्यालय येथे आयोजित कार्यक्रमास कार्यक्रमास सहायक आयुक्त, समाज कल्याण विशाल लोंढे, कर्वे समाज सेवा संस्थेचे विश्वस्त मधूकर पाठक, समाज कल्याण विभागाचे विशेष अधिकारी मल्लीनाथ हरसुरे, कर्वे समाज सेवा संस्थेचे विश्वस्त संदिप खर्डेकर, चेअरमन विनायक कराळे, ग्लोबन्ट प्रा. लि.चे एशिया हेड शिवराज साबळे, डिजिटल टास्क फोर्सचे रोहन न्यायाधिश, सीएसआर सेंटर फॉर मेंटल हेल्थचे मानद संचालक डॉ. महेश ठाकूर, ऑस्कॉप संस्थेचे उपाध्यक्ष श्रीराम बेडकिहाळ, नीलकंठ बजाज, ज्येष्ठ नागरिक आदी उपस्थित होते.

डॉ. महेश ठाकूर यांनी ज्येष्ठ नागरिकांची सायबर गुन्हेगारीद्वारे आर्थिक फसवणुक होण्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याने तसेच ज्येष्ठ नागरिकांना याबाबत नवीन माहिती व याबाबतचे ज्ञान मिळण्यासाठी सायबर गुन्हेगारीबाबत मार्गदर्शन व परिसंवाद या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.

याप्रसंगी श्री. साबळे यांनी सायबर गुन्हेगारीद्वारे ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक फसवणुक कशा पध्दतीने होते व ती आपल्या सतर्कतेने कशी रोखता येते याबाबत मार्गदर्शन केले. ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या मोबाईलवर संशयास्पद येणाऱ्या विविध संकेतस्थळांच्या लिंक ओपन करु नये. तसेच वन टाईम पासवर्ड (ओटीपी) कोणालाही उघड करु नये, आदी मार्गदर्शन त्यांनी केले.

श्री. लोंढे म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या वेळेचा सदुपयोगासाठी विविध विषयांच्या अद्ययावत असणाऱ्या माहितीचे वाचन करून आपल्या व पुढील पिढीसाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावावी. ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कायद्यांबाबत माहिती घेऊन अडचणी सोडविण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करावा. समाज कल्याण कार्यालयात ज्येष्ठ नागरिक कक्ष लवकरच स्थापन करण्यात येईल. तसेच प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये विरंगुळा केंद्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले जातील. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्यासह त्यांना विविध सोयी-सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही ते म्हणाले.

श्री. न्यायाधीश यांनी कोणताही अॅप डाऊनलोड करताना सहजपणे आपण परवानगी देत असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची फसवणुक कशा पद्धतीने केली जाते. बनावट व्हिडिओज कसे पाठविले जातात आणि त्या माध्यमातून कशा पद्धतीने आर्थिक फसवणूक केली जाते याबाबत माहिती देवून सायबर गुन्हेगारी कशा प्रकारे रोखता येईल याबाबत मार्गदर्शन केले.

Exit mobile version