प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सुधारित बस बांधणी मानकांना मान्यता
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): बसची बांधणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या मानकांना केंद्रियमंत्री नितीन गडकरी यांनी मान्यता दिली आहे. ही मानकं मूळ उपकरणं उत्पादक आणि बसचा सांगाडा बांधणारे कारागीर या दोघांनाही एकसमान लागू होतील अशी माहिती समाज माध्यामावर प्रसारित करण्यात आलेल्या संदेशांत देण्यात आली आहे. यामुळे भारतातील बसगाड्यांच्या गुणवत्तेत आणखी सुधारणा करण्याचा मार्ग मोकळा होईल असं गडकरी यांनी सांगितलं.बस दुर्घटना टाळण्यासाठी भारतात बस बांधणीचा दर्जा वाढवण्याची गरज होती. आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्याला या नव्या यंत्रणेत प्राधान्यक्रम देण्यात आला असल्याचंही गडकरी यांनी सांगितलं.यासंदर्भातील सूचना मागवण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून या मानकांसाठी तयार करण्यात आलेल्या मसुद्यासंदर्भात अधिसूचना प्रकाशित केली आहे. बसमधील सर्व प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणा या उपक्रमाला पाठिंबा देतील अशी आशा गडकरी यांनी या संदेशांत व्यक्त केली आहे.