देशातल्या पारंपरिक बियाण्यांचं संरक्षण आणि संवर्धन बीज सहकारिता कृषी समिती करेल – केंद्रीय मंत्री अमित शहा
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या पारंपरिक बियाण्यांचं संरक्षण आणि संवर्धन तसंच ही बियाणी जगभरातल्या शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्याचं काम बीज सहकारिता कृषी समिती करेल असं प्रतिपादन सहकार मंत्री अमित शहा यांनी आज केलं. बीज सहकारिता कृषी समितीने ‘सहकार क्षेत्राच्या माध्यमातून सुधारित आणि पारंपारिक बियाणांचं उत्पादन’ या विषयावर नवी दिल्लीत आयोजित केलेल्या चर्चासत्राला ते संबोधित करत होते. जगातील एकूण बीज उत्पादनात भारताचा वाटा एक टक्क्याहूनही कमी आहे. वैज्ञानिक पद्धतीने उत्पादित बियाणे भारतीय शेतकऱ्यांच्या वापरात नसतात. त्यामुळे बीज उत्पादन आणि बीजनिर्यातीकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावं असा आवाहनही शहा यांनी यावेळी केलं. भारतीय बीज सहकारी समितीची उद्दिष्टं, पिकांची पोषकमूल्ये आणि उत्पादन याबाबतीत बियाणांचं महत्व, छोट्या तसंच मध्यम शेतकऱ्यांच्या विकासात सहकारी समित्यांची भूमिका अशा विषयांवर या चर्चासत्रात चर्चा होत आहे.