Site icon साप्ताहिक एकच ध्येय

नवयुवा मतदारांची अधिकाधिक प्रमाणात नाव नोंदणी करा – विभागीय आयुक्त

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी घेतला विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा आढावा

पुणे : भारत निवडणूक आयोगाच्यावतीने घोषित करण्यात आलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी; तसेच नवीन युवा मतदारांची अधिकाधिक प्रमाणात नोंदणी होण्याच्याष्टीने मोहिमस्तरावर काम करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त तथा पुणे विभागासाठीचे मतदार यादी निरीक्षक सौरभ राव यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा आढावा बैठकीच्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार ॲड. अशोक पवार, उपायुक्त महसूल रामचंद्र शिंदे, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, उपजिल्हाधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी अर्चना तांबे, सहायक मतदार नोंदणी अधिकारी तसेच विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्री. राव म्हणाले, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची व्यापक स्वरुपात जनजागृती करण्यात यावी. यासाठी विविध राजकीय पक्ष, प्रसार माध्यमे, सामाजिक संस्थांची मदत घ्यावी. ‘स्वीप’ कार्यक्रमाअंतर्गत मतदार संघनिहाय मतदार नोंदणी शिबीराचे आयोजन करावे. या शिबारांची माहिती सर्व संबंधित यंत्रणेला देण्यात यावी, असेही ते म्हणाले.

मतदान प्रकियेत १८ ते १९ आणि २० ते २९ या या वयोगटातील युवकांचा सहभाग लोकसंख्येच्या प्रमाणात कमी आहे, यावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. याकामी सर्व मतदान केंद्रांना मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी स्वतः भेटी देऊन पडताळणी करावी. मतदार यादीतील दुबार व मयत, नावे, पत्ता व छायाचित्रे समान असलेली नावे कमी करण्याची प्रक्रिया राबवावी. मतदार यादीतील तपशीलातील दुरुस्ती करुन ती अद्ययावत करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

राजकीय पक्षासोबत समन्वय साधून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेत त्यांना सक्रीय
सहभागी करून घ्यावे अशा सूचना करून, राजकीय पक्षांनी आपल्यास्तरावर असलेल्या सूचना किंवा तक्रारी निवडणूक यंत्रणेला कळवाव्यात. या सुचना व तक्रारीची दखल घेऊन संबंधित यंत्रणेने कार्यवाही करावी. सहायक निवडणूक अधिकाऱ्यांनी याकामी स्वत: वैयक्तिक लक्ष देवून काम करावे, असेही ते म्हणाले.

मतदार नोंदणीकरीता अनिवासी भारतीय नागरिकांच्या बाबतीत संबंधित कंपन्यांशी संपर्क साधून शिबीरे आयोजित करावीत. परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत संपर्क साधावा. महिला, शरीर विक्रय व्यवसाय करणाऱ्या महिला, तृतीयपंथीय, दिव्यांग, भटक्या विमुक्त जाती जमाती, आदी घटकांतील नागरिकांची मतदार नोंदणी करावी. मतदार यादीत समाजातील सर्व घटकांचा समावेश होईल, याकडे लक्ष द्यावे, अशा सूचनाही विभागीय आयुक्त श्री. राव यांनी दिल्या.

आमदार श्री. पवार म्हणाले, लोकसंख्या आणि मतदार यांचे प्रमाण लक्षात घेऊन मतदार नोंदणीचे काम करावे. ग्रामीण व शहरी भागातील दुबार, मयत, स्थलांतरित मतदारांची नावे कमी करण्याची कार्यवाही करावी. या प्रक्रियेत राजकीय पक्षाचा सहभाग वाढवावा, अशा सूचना त्यांनी केल्या.

उपजिल्हाधिकारी श्रीमती तांबे म्हणाल्या, मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात मतदार नोंदणी जनजागृतीकरीता स्वीप कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमाचे आयोजन करून नागरिकांना मतदार नोंदणीसाठी आवाहन येत आहे. मतदार नोंदणीसाठी सहकारी गृहनिर्माण सोसायटीत मेळावे, महिला, कामगार, युवक, दिव्यांग, तृतीयपंथीय आदी घटकांकरीता मेळाव्याचे आयोजन करुन मतदार नोंदणी करण्यात येत आहे. आगामी काळातही मतदार नोंदणी जनजागृतीकरीता विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

उपजिल्हाधिकारी श्रीमती कळसकर म्हणाल्या, विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक सोमवारी राजकीय पक्षांसोबत आणि दररोज सहायक निवडणूक अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येत आहे. अधिकाधिक मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यात मतदार संघनिहाय मेळावे, शिबारांचे आयोजन करण्यात येत आहेत. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणेसोबत समन्वय साधून काम करण्यात येत आहे.

यावेळी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी मतदार यादीच्या अनुषंगाने सूचना मांडल्या.

Exit mobile version