Site icon साप्ताहिक एकच ध्येय

भाजपाचे नेते आज राज्यपालांची भेट घेणार

मुंबई (वृत्तसंस्था) : महायुतीला स्पष्ट जनादेश असून कोणत्याही क्षणी सरकार स्थापनेची बातमी येऊ शकते, असं भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. मुनगंटीवार आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज राज्यपालांची भेट घेणार आहेत.

भाजपाच्या गाभा समितीची काल मुंबईत बैठक झाली. त्यानंतर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली. महायुंतीचं सरकार लवकरात लवकर स्थापन व्हावं यासाठी भाजपा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असं ते म्हणाले. नव्या प्रदेशाध्यक्षांची आणि जिल्हा अध्यक्षांनी निवड ३१ डिसेंबरपूर्वी करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली. राज्यात विद्यमान विधानसभेची मुदत येत्या ८ तारखेला संपत असून राजकीय चर्चा आणि घडामोडींना वेग आला आहे.

विधानसभा निवडणूकीत भाजपाला सर्वाधिक १०५ जागा मिळाल्या असून शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. राज्यापालांनी भाजपाला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केल्यास भाजपाला शिवसेनेची मनधरणी करण्यास आणखी पंधरा दिवसांचा कालावधी मिळेल. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्या सर्व नवनिर्वाचित आमदांराची बैठक बोलावली आहे. तत्पूर्वी आज सकाळी मुंबईत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबईत शिवसेनेची भूमिका मांडली.

विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीच भाजपा आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्री पदाच्या वाटपाबाबत एकमत झालं होतं, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज मुंबईत बातमीदारांना सांगितलं. निवडणुकीच्या आधी जे ठरलं होतं, आणि ज्यावर सहमती झाली होती ते पाळावं, अशी शिवसेनेची अपेक्षा आहे. नव्या प्रस्तावात वेळ घालवण्याची गरज नाही, असं राऊत म्हणाले. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याच्या शक्यतेबाबत विचारलं असता आम्ही त्याला जबाबदार नाही, जे असा कट आखत आहेत, ते जनादेशाचा अपमान करत आहेत, असंही राऊत म्हणाले.

काँग्रेस नेते हुसैन दलवाई यांनी आज मुंबईत संजय राऊत यांची भेट घेतली. दरम्यान राज्यात जनादेशाचा आदर करत भाजपा आणि शिवसेनेनं लवकरात लवकर सरकार स्थापन करावं, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते.

सरकार स्थापनेत आपली कसलीही भूमिका नाही. जनतेचा कौल भाजपा-शिवसेना युतीच्या बाजूनं आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावावी असा जनादेश आहे, असं ते म्हणाले.

Exit mobile version