राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कारवाईत दहशतवादी संघटनांचं जाळं उघड
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): राष्ट्रीय तपास यंत्रणा, एन आय एनं महाराष्ट्र आणि कर्नाटकात मिळून ४४ ठिकाणी छापे घालून इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया म्हणजेच इसिसच्या १५ हस्तकांना काल अटक केली. महाराष्ट्रात ठाण्याजवळ पडघा आणि मीरा रोड इथं, तसंच पुण्यात तर कर्नाटकात बंगळुरू इथं ही कारवाई करण्यात आली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोकड, घातक शस्त्रास्त्रं, गुन्ह्यातले दस्तऐवज,स्मार्टफोन आणि इतर डिजिटल उपकरणं जप्त करण्यात आली.
इसिसच्या हिंसक दहशतवादी कृत्यांचा बीमोड करण्यासाठी NIA कडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत असून त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली, असं NIA यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. ठाणे जिल्ह्यातलं पडघा हे गाव –मुक्त क्षेत्र- म्हणून या हस्तकांनी स्वतःच घोषित केलं होतं. मुस्लिम युवकांनी पडघा इथं स्थानांतरित होऊन हे क्षेत्र बळकट करावं, असं प्रोत्साहन या हस्तकांद्वारे दिलं जात होतं असं या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.