पालकांनी मुलांना गोष्ट सांगण्याच्या पुण्यातील उपक्रमाची विश्वविक्रमात नोंद
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने पुण्यात उद्यापासून २४ डिसेंबरपर्यंत पुणे पुस्तक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवाच्या अनुषंगाने वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. या अंतर्गत काल सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या, ‘पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगायच्या’ उपक्रमाची विश्वविक्रमात नोंद झाली आहे. या उपक्रमात, सुमारे तीन हजार ६६ पालकांनी सहभागी होत आपल्या पाल्यांना सलग चार मिनिटं गोष्ट वाचून दाखवली. या उपक्रमानं चीनचा आठ वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम मोडीत निघाला आणि नवा विश्वविक्रम प्रस्थापित झाला. चीनमध्ये साधारण आठ वर्षांपूर्वी दोन हजार ४७९ पालकांनी एकाचवेळी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगितल्या होत्या.
विश्वविक्रमाची नोंद होताच ढोल ताशांचा गजर करत देशभक्तीपर गीतं म्हणून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विश्वविक्रमाबद्दल पुणेकरांचं कौतुक केलं आहे. याच पुस्तक महोत्सवाच्या अनुषंगानं काल ‘शांतता.. पुणेकर वाचत आहेत’ हा उपक्रमही राबवण्यात आला. शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठं, सामाजिक संस्था, सरकारी आणि खासगी कार्यालयं, महापालिकेची क्षेत्रिय कार्यालयं आणि खासगी आस्थापना तसंच पत्रकार, कलाकार, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील सन्माननीय व्यक्तींनीही या उपक्रमात सहभाग घेत उपक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला.
पुण्यात विविध चौकांत, रिक्षा थांब्यांवर, सरकारी तसंच खासगी कार्यालयांमध्ये देखील या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला. नागपूरमध्ये सुरू असलेल्या विधीमंडळ अधिवेशनाच्या कामकाजातून वेळ काढत विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक मान्यवर या उपक्रमात सहभागी झाले.