जल जीवन मिशन अंतर्गतची कामे मार्च २०२४ अखेर पूर्ण करा – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
Ekach Dheya
पुणे : ग्रामीण भागात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी व तेथील जीवनमान उंचावण्यासाठी जल जीवन मिशन राबविण्यात येत असून या मोहिमेअंतर्गत करण्यात येणारी कामे मार्च २०२४ अखेर पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, ग्रामीण पाणी पुरवठा बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश खताळ, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पच्या नियोजन अधिकारी सुनेत्रा पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, जल जीवन मिशन अंतर्गत सर्वात जास्त योजना पुणे जिल्ह्यात सूरू आहेत. प्रत्येक गावामध्ये पेयजलाचा नियमित पुरवठा होण्यासाठी आराखड्यात नमूद केलेल्या उपाययोजनेची विहित वेळेत अंमलबजावणी करावी. जल जीवन मिशन अंतर्गत सुरु असलेली प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत. कामे गुणवत्तापूर्ण होणे आवश्यक आहे. कामाच्या प्रगतीबाबत प्रत्येक आठवड्यात आढावा घ्यावा.
वनविभागाची जागा, गायरान, पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, वैयक्तिक मालकी जागा व इतर जागा अडचणीबाबत संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून जागा हस्तांतरीत करून घ्याव्यात, कामांची गती वाढवावी. कामे पूर्ण करताना पाणी व कामाच्या गुणवत्तेला प्राधान्य द्यावे. पिण्याच्या पाण्याची प्रयोगशाळेत तपासणी करुन घ्यावी. वैयक्तिक मालकी असलेल्या जागेचे दानपत्र करून घ्यावे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडून प्रलंबित जोडण्यासाठी आवश्यक अर्ज भरून द्यावेत. कामे सुरू होऊन नंतर बंद पडली आहेत अशी कामे तातडीने पुन्हा सुरू करावीत, अशा सूचनाही श्री. देशमुख यांनी दिल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चव्हाण म्हणाले, पुणे जिल्ह्यात १ हजार २३० योजना सूरू आहेत. जल जीवन मोहिमेअंतर्गत सुरु असलेली सर्वच कामे वेळेत पूर्ण करण्याची संबंधितांनी दक्षता घ्यावी. कामाबाबत काही अडचण असल्यास वरिष्ठांना अवगत करावे. पाईपलाईनची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीत तालुकानिहाय जल जीवन मिशन अंतर्गत कामांची सरासरी भौतिक प्रगतीची रँकिंग, १०० टक्के काम पूर्ण झाल्याचा आणि पाणीपुरवठा सुरू झाला याबाबतचा गोषवारा, प्रलंबित कामे, कंत्राटदाराचा प्रतिसाद, कार्यात्मक घरगुती नळ जोडणीचा कार्य गोषवारा, वीज जोडणी समस्या, रस्त्याच्या कडेला पाईप टाकण्याच्या समस्या, सौर यंत्रणा कार्य गोषवारा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडील कामाची भौतिक प्रगतीची स्थिती, कार्यात्मक घरगुती टॅप कनेक्शन ऑनलाईन नोंदणी, तृतीय पक्ष तपासणी संस्था व इंडस्ट्री स्टँडर्ड आर्किटेक्चर यांच्या कामाची स्थिती इत्यादी विषयावर चर्चा करण्यात आली.
कार्यकारी अभियंता श्री. खताळ यांनी जल जीवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्या कामाबाबत सादरीकरणानद्वारे माहिती दिली. प्रलंबित कामे अधिक वेगाने पूर्ण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.