मुंबई (वृत्तसंस्था) : मोटर वाहन कायद्यातल्या दुरुस्तीविरोधात ट्रक चालकांच्या आंदोलनानंतरही मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा, बटाटा आणि भाजीपाल्याची आवक सुरळीत सुरु आहे आणि भाजीपाल्याचे दरही सामान्य आहेत. सुमारे ५०० हून अधिक गाड्या आज बाजार समितीत दाखल झाल्या. मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातून येणारा हिरवा वाटाणा आणि गाजराच्या गाड्यांची आवक थांबली असली तरी त्याचा फारसा परिणाम होणार नसल्याचं भाजीपाला मार्केटचे संचालक शंकर पिंगळे यांनी सांगितलं.
मात्र मसाला आणि धान्य मार्केटमध्ये या संपाचा परिणाम दिसून आला. धान्य मार्केटमध्ये आज ५५ टक्के आणि मसाला मार्केटमध्ये ६५ टक्के मालाची आवक कमी झाली आहे. या दोन्ही मार्केटमध्ये बाजारभावात आज फारसा फरक जाणवणार नाही. मात्र ट्रकची आवक कमी झाली तर बाजारभावावर परिणाम होण्याची शक्यता असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी आकाशवाणीला दिली. मनमाडजवळच्या पानेवाडी डेपोतून टँकर भरण्यावर चालकांनी टाकलेला बहिष्कार मागे घेतल्याची माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली.हिंगोलीत वाहन चालक-मालक संघटनेनं काही ठिकाणी चक्का जाम आंदोलन केलं.