मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचं नेतृत्व शिवसेनेचाच मुख्यमंत्री करेल, त्यासाठी शिवसेनेकडे पर्याय असल्याचं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते आज दुपारी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. युती तोडण्याचं पाप शिवसेना करणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी २४ तारखेला निकाल लागल्यापासून तीन वेळा सांगितलं आहे. मात्र, लोकसभा निवडणुकांआधी दोन्ही पक्षात ठरल्याप्रमाणे अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदासह सत्तेत समान वाटा मिळाला पाहिजे, या मागणीवर शिवसेना ठाम आहे.
राज्यात राष्ट्रपती राजवट आणण्याचा घाट भाजपा घालत आहे. राष्ट्रपती राजवट आणणं महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अपमान असल्याचं सांगून राऊत यांनी सध्याच्या राजकीय पेचासाठी भाजपाला जबाबदार ठरवलं. भाजपाची दडपशाही चालणार नाही, भाजपा दावा करत असेल तर संख्याबळ त्यांनी सिद्ध करुन दाखवावं, असं राऊत म्हणाले.