राष्ट्र प्रथम हा दृष्टीकोन असल्यानं कठोर निर्णय घेणं कठीण वाटत नसल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): सर्व निर्णय देशहित मनात ठेवून घेतले आहेत. राष्ट्र प्रथम हा दृष्टीकोन समोर ठेवून निर्णय घेत असल्यानं कुठलाही कठोर निर्णय घेणं कठीण वाटत नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. एका खासगी नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते.
मोदी की गॅरंटी हे निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून केलेलं नसून हा गरीबांचा विश्वास आहे. देशातल्या गरीबांनाही याची जाणीव आहे की नरेंद्र मोदी त्यांच्या कर्तव्यात कमी पडणार नाही, असं प्रधानमंत्री म्हणाले. रोजगारनिर्मितीला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत असं त्यांनी सांगितलं.
पायाभूत सुविधांमध्ये केलेला विकास मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगारनिर्मिती करतो. त्यामुळं कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची निर्मिती सुरू असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. गेल्या दहा वर्षात भारतीय अर्थव्यवस्था २ ट्रिलियन डॉलर्सवरुन पावणे ४ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोचल्याचं त्यांनी सांगितलं.