Site icon साप्ताहिक एकच ध्येय

लाल समुद्र आणि एडनच्या आखातातल्या जहाजांवरचे हल्ले थांबवण्याचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं हौती दहशतवाद्यांना आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येमेनच्या हौती या अतिरेकी संघटनेनं लाल समुद्र आणि एडनच्या आखातातल्या जहाजांवरचे हल्ले थांबवावेत असं आवाहन संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं केलं आहे.  सुरक्षा परिषदेनं काल जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, हे हल्ले बेकायदेशीर असून, त्यामुळे प्रादेशिक स्थैर्य, नौवहनाचं स्वातंत्र्य आणि जागतिक पुरवठा साखळीला धोका निर्माण झाला आहे.

येमेनच्या मोठ्या प्रदेशावर नियंत्रण असलेल्या हौतीनं आतापर्यंत लाल समुद्रातल्या २0 पेक्षा जास्त मालवाहू जहाजांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे हल्ले केले आहेत. हे हल्ले गाझा पट्टीतल्या पॅलेस्टिनींना समर्थन दर्शवण्यासाठी असून, इस्राएलशी संबंधीत अथवा इस्राएल कडे मार्गस्थ जहाजांवर आपण हल्ले केल्याचं स्पष्टीकरण हौती अतिरेक्यांनी दिलं आहे. मात्र, यापैकी अनेक जहाजांचा इस्रायलशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट झालं आहे. लाल समुद्रातल्या तणावामुळे अनेक जहाज कंपन्यांनी या मार्गावरची वाहतूक स्थगित केली आहे.

दरम्यान, हौतींनी लाल समुद्रातल्या जहाजांवरचे  हल्ले थांबवले नाहीत, तर त्यांना गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल, असा इशारा अमेरिकेच्या नेतृत्वाखालच्या बारा देशांनी जारी केलेल्या निवेदनात दिला आहे.

Exit mobile version