नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्याबद्दल केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं शिकवणी वर्ग चालवणाऱ्या 31 संस्थाना नोटीसा बजावल्या आहेत. तसंच दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबद्दल नऊ संस्थांना दंडही ठोठावण्यात आला आहे.
काही शिकवणी वर्ग चालवणाऱ्या संस्था यशस्वी उमेदवारांनी निवडलेले अभ्यासक्रम, अभ्यासक्रमाचा कालावधी आणि त्याचं शुल्क यासंबंधीची माहिती हेतुपुरस्सर लपवून ठेवून ग्राहकांची दिशाभूल करतात, असं CCPAच्या निदर्शनास आल्यानं ही कारवाई करण्यात आली. काही संस्था पडताळून पाहण्याजोगे पुरावे न देता शंभर टक्के नोकरीकरिता निवड होण्याची हमी असा दावा करतात, असंही निरीक्षण CCPAनं नोंदवलं आहे.
दरम्यान शिकवणी वर्गांच्या क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबद्दल मार्गदर्शक सूचनांची रुपरेषा निश्चित करण्यासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाची काल पहिली बैठक पार पडली. त्यामध्ये समितीनं मार्गदर्शक सूचनांच्या मसुद्यावर चर्चा केली.