भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही देश उत्पादनांच्या मागणीला चालना देण्यासाठी कटिबद्ध – न्यूझीलंडचे भारतातील उच्चायुक्त
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही देश परस्परांमधले व्यापारातले अडथळे दूर करण्यासाठी आणि दोन्ही देशातल्या उत्पादनांच्या मागणीला चालना देण्यासाठी कटिबद्ध असून परस्परांमधल्या व्यापाराला अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी एकत्रितपणे कार्यरत आहेत, असं भारतातले न्यूझीलंडचे उच्चायुक्त डेव्हिड पाईन यांनी सांगितलं. २०२२-२३ मध्ये दोन्ही देशातला द्विपक्षीय व्यापार एक अब्ज अमेरिकी डॉलर इतका होता. भारत हा न्यूझीलंडचा ‘अकरावा सर्वात मोठा व्यापारी भागीदार’ असल्याचं ते म्हणाले.
परस्पर देशातल्या व्यावसायिक संधींचा लाभ घेण्यासाठी दोन्ही देशातल्या व्यापार विषयक घटकांना एकत्र आणण्यावर दोन्ही देश लक्ष केंद्रित करत असल्याचं पाईन यांनी सांगितलं. दोन्ही देशातली ‘संयुक्त व्यापार समिती ‘ परस्परांमधला व्यापार सुलभ करण्यासाठी न्यूझीलंड मध्ये लवकरच पुढची बैठक घेईल, असंही पाईन यांनी स्पष्ट केलं. १९८६ मध्ये या समितीची स्थापना झाली असून गेल्या वर्षीच्या डिसेंबर मध्ये वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी न्यूझीलंडच्या वाणिज्य मंत्र्यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीत व्यापाराला प्रोत्साहन देणं, विकास आणि सहकार्य आदी मुद्द्यांवर चर्चा झाली होती.