Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कार्तिकी एकादशीनिमित्त महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा

पंढरपूर : राज्यातील शेतकरी आणि सामान्य जनता सुखी होऊ दे, असे साकडे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी सकाळी घातले.

महसूलमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी यांची शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर संत तुकाराम भवन येथे झालेल्या कार्यक्रमात श्री. पाटील यांच्या हस्ते मानाचे वारकरी श्री. सुनील महादेव ओमासे आणि सौ. नंदा ओमासे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

श्री. पाटील म्हणाले, ‘यावर्षी राज्यासमोर अनेक आव्हाने आली. सुरुवातील दुष्काळस्थिती होती. त्यानंतर महापुराला सामोरे जावे लागले आणि आता अवकाळी पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाने उपाययोजना केल्या आहेत. केंद्र सरकारकडेही  मदत  मागितली आहे’.

मागील तीन चार वर्षे वारी ‘निर्मल वारी’ करण्यासाठी प्रयत्न केला गेला. वारीच्या मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवण्यासाठी प्रयत्न केले गेले. त्याला अतिशय चांगले यश आले. पुढील वर्षी धूरमुक्त वारी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असणार आहे, असे श्री. पाटील यांनी सांगितले.

बेडग गावचे ओमासे ठरले मानाचे वारकरी

मानाचा वारकरी ठरलेले सुनील ओमासे सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेडग येथील आहेत. शेतकरी कुटुंबातील ओमासे २००३ पासून वारी करतात. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांना चांदीची विठ्ठल रुक्मिणी मूर्ती, शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना मोफत एसटी पासही देण्यात आला.

Exit mobile version