Site icon साप्ताहिक एकच ध्येय

क्रूझ पर्यटनामध्ये रोजगार विकास आणि निर्मितीची अपार क्षमता- मनसुख मांडवीय

मुंबई : देशात क्रूझ पर्यटनाच्या विकासासाठी अपार क्षमता असल्याचे नौवहन राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) मनसुख मांडवीय यांनी म्हटले आहे. मुंबई बंदरावर आगमन झालेल्या ‘कोस्टा व्हिक्टोरिया’ या परदेशी क्रूझ जहाजावर ते बातमीदारांशी बोलत होते. क्रूझ पर्यटन हे रोजगाराचे प्रमुख साधन बनू शकते असे ते म्हणाले. जागतिक नौवहन उद्योगामध्ये 2.30 लाख भारतीय खलाशी सेवेत आहेत असे ते म्हणाले.

क्रूझ कंपन्या, सहसंचालक आणि सीमाशुल्क विभागासारख्या विविध संबंधितांमध्ये समन्वयाने या क्षेत्राचा विकास करण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या काही वर्षात अनेक परदेशी क्रूझ नौका भारतात मोठ्या संख्येने येत आहेत. केंद्र सरकारने परदेशी क्रूझ नौकांना भारतात आकर्षित करण्यासाठी क्रूझ नौकांना नांगर टाकण्यासाठी जागा, ई-व्हिसा आणि बायोमेट्रिक सवलत यासारख्या अनेक उपाययोजना केल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकार किनारपट्टी तसेच अंतर्गत जलमार्ग विकसित करण्यावर भर देत आहे जेणेकरुन पर्यटनाला चालना मिळेल असे ते म्हणाले. यासाठी सरकारने टुरिस्ट सर्किटची निवड केली आहे. महाराष्ट्रात तारकर्ली, मुरुड-जंजीरा आणि गणपतीपुळे ही क्रूझ पर्यटनाच्या विकासासाठी प्रमुख ठिकाणं म्हणून पाहिली जात आहेत असे त्यांनी सांगितले.

मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटीया यावेळी उपस्थित होते. गेल्या चार वर्षात भारतीय बंदरांवरील सागरी वाहतुकीत लक्षणीय वाढ झाल्याचे त्यांनी नमूद केले.

Exit mobile version