नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांनी इतर पक्षांना पुरेसा अवधी दिला नाही या आरोपाचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी इन्कार केला आहे. ए. एन.आय या वृत्तसंस्थेला ते थोड्या वेळापूर्वी मुलाखत देत होते.
निवडणुकीचे निकाल लागल्यापासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी १८ दिवस वाट पाहिली आणि नंतर राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानं सर्वात जास्त नुकसान भाजपाचं झालं असल्याचा दावा त्यांनी केला. निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील असं आपण अनेक वेळा जाहीर सभांमधे बोललो होतो, त्यावेळी कोणीही आक्षेप घेतला नव्हता, असं शहा यांनी स्पष्ट केलं.
राज्यपालांनी कोणतीही घटनाबाह्य कृती केलेली नाही. आपल्याला सरकार स्थापनेची संधी नाकारल्याचा कांगावा इतर पक्ष करत आहेत असं ते म्हणाले.