पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेत विविध पदावर कार्यरत असताना लाच घेणार्या व फौजदारी गुन्हे दाखल असलेल्या 16 सेवानिलंबित कर्मचार्यांना निलंबन आढावा समितीने पुन्हा सेवेत घेतले. त्यामुळे महापालिकेची जनमाणसात प्रतिमा मलीन झाली आहे. या कर्मचार्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा आदेश त्वरीत रद्द करण्याची सूचना महापौर राहूल जाधव यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केली आहे.
आयुक्त हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या निलंबन समितीच्या शिफारशीवरुन महापालिका सेवेत 16 कर्मचार्यांना रुजू करुन घेण्यात आले आहे. या सेवानिलंबित कर्मचार्यांमध्ये बांधकाम व्यावसायिकांकडून लाच घेणे, ठेकेदाराकडून लाच घेणे तसेच विनयभंग व इतर फौजदारी गुन्हे दाखल असताना या कर्मचार्यांचे निलंबन रद्द करण्यात येऊन त्यांना मनपा सेवेत रुजू करुन घेतले आहे.
सेवानिलंबन रद्द केल्यामुळे महापालिकेची जनमाणसातील प्रतिमा मलीन झाली आहे. तसेच प्रशासकीय कामकाजावर जनसामान्यांतून प्रश्नचिन्ह निर्माण होत असून अधिकारी व कर्मचार्यांमध्ये अशा प्रवृत्तीस चालना मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कर्मचार्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा आदेश त्वरीत रद्द करावा, अशी सूचना महापौर जाधव यांनी केली आहे.