नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राफेल विमानखरेदी प्रकरणी आधीच्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी दाखल झालेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या. या खरेदीसाठीच्या निर्णय प्रक्रीयेत शंका घ्यायला वाव नसल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयांन १४ डिसेंबर २०१८ ला दिला होता. या निर्णयाचा फेरविचार करावा, आणि राफेल विमानखरेदी प्रक्रियेची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करावी, अशी विनंती करणार्या याचिका त्यावर दाखल झाल्या होत्या.
माजी केंद्रीय मंत्री यशंवत सिन्हा आणि अरुण शौरी, तसंच विधीज्ञ प्रशांत भूषण यांचा याचिकाकर्त्यांमधे समावेश होता. या प्रकरणातली महत्त्वाची वस्तुस्थिती दडपली असल्याचा आरोप करत, याप्रकरणी फौजदारी गुन्हा नोंदवण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. ती न्यायालयानं फेटाळून लावली. दरम्यान न्यायालयाच्या या निर्णयाचं भाजपानं स्वागत केलं आहे.
नरेंद्र मोदी सरकारसाठी हा मोठा विजय असून सत्याचा विजय झाल्याचा पक्षाचे प्रवक्ते जी व्ही एल नरसिंहराव यांनी म्हटलं आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे.